बेळगाव (वार्ता) : कणबर्गी गावातील परिशिष्ट जातीच्या लोकांना स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली कणबर्गी येथील परिशिष्ट जातीच्या नागरिकांनी आज जिल्हाधिकार्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. बेळगाव तालुक्यातील महानगरपालिकेच्या व्याप्ती येणार्या कणबर्गी गावातील आंबेडकर गल्ली आणि परिसरातील रहिवासी असलेल्या परिशिष्ट जातीच्या लोकांसाठी स्मशानभूमी नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार करणे त्रासाचे आणि गैरसोयीचे होत आहे. तेंव्हा गावानजीकच्या गायरान जमिनीतील आरयस नं. 681 मधील 19 एकर 37 गुंठे पड जमिनीपैकी 4 एकर 12 गुंठे खुली जागा आहे. या जागेतील 2 एकर जागा परिशिष्ट जातीच्या लोकांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी म्हणून द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी शिवाजी सुंठकर आणि संजय सुंठकर यांच्यासह सदानंद मेत्री, विवेकानंद मेत्री, फकीरप्पा जकाती, रवी विरगन्नावर, सिद्राय मेत्री, लक्ष्मण मेत्री, यल्लाप्पा विरगन्नावर आदी परिशिष्ट जातीचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
