Sunday , October 13 2024
Breaking News

बेळगाव जिल्हा एनयुजेएम शाखेच्यावतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

Spread the love

बेळगाव (वार्ता) : पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हित-हक्कासाठी कार्यरत राहणारा पत्रकार मात्र नेहमीच शासकीय सेवासुविधापासून वंचित राहिला आहे. अशा पत्रकारांच्या हितासाठी आणि सन्मानासाठी कार्य करीत असतानाच पत्रकारांना शासकीय सेवा सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (एनयुजेएम) माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्णय एनयुजेएम, बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने सर्वानुमते घेण्यात आला.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. शहापूर-बॅ. नाथ पै. चौक येथील एनयुजेएम, बेळगाव जिल्हा शाखेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी चिटणीस आणि बेळगाव वार्ता न्यूज पोर्टलचे संपादक सुहास हुद्दार, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण, संदेश न्यूजच्या संपादिका अरुणा गोजे-पाटील, युनियन सल्लागार सीए संदिप खन्नुकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच एनयुजेएमच्या माध्यमातून विधायक सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच पत्रकारांच्या हितोन्नती आणि सन्मानासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
एनयुजेएम बेळगाव जिल्हा शाखेचे प्रमुख आणि नॅशनल टुडे न्यूज पोर्टलचे संपादक श्रीकांत काकतीकर यांनी एनयुजेएम या पत्रकार संघाच्या कार्य आणि उद्देश याची माहिती देऊन संघाच्या माध्यमातून भविष्यात लोकहिताबरोबरच पत्रकारांच्या हिताकरिता कार्य करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचे आवाहन संघ सदस्यांना केले.
स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीगर, संदेश न्यूजच्या संपादिका अरुणा गोजे-पाटील यांनी पत्रकार हिताच्या अनुषंगाने विचार मांडले. सीए संदीप खन्नुकर, एचएलएल कंपनीचे समन्वयक अमित उंडाळे यांनी पत्रकार बांधवांसाठी असणार्‍या शासकीय सुविधा संदर्भात माहिती देऊन पत्रकारांसाठी असणार्‍या सोयी-सवलती पत्रकारापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. संतोष दरेकर, माधुरी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढील काळात सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित पत्रकारांना 2300 रुपये किमतीचे बूस्टर आणि सेफ्टी कीट प्रदान करण्यात आले. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला विश्वनाथ येळ्ळूरकर, बेळगाव प्राईड न्यूजचे अमृत बिर्जे, बीएन7 न्यूजचे रवींद्र जाधव, स्मार्ट न्यूजचे रवी मालशेट, निलिमा लोहार, वैष्णवी काकतीकर यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *