कागवाड : महाराष्ट्रातून राजापूर बॅरेजमधून कर्नाटकातील कृष्णा नदीला सोडण्यात येणारे पाणी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
कागवाड तालुक्याच्या कर्नाटक संरक्षण मंचाचे तालुका मानद अध्यक्ष शिवानंद नवीनाळ यासंदर्भात बोलताना म्हणाले की, प्रत्येक उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेरीस कृष्णा नदीत पाणी नसल्याने उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातील जत आणि अक्कलकोट तालुक्यातून कर्नाटकातील सीमावर्ती भागात पाणी पुरवठा करण्याची मागणी कर्नाटक सरकारने केली आहे. यानुसार महाराष्ट्राने राजापूर बॅरेजमधून पाणी सोडले असून महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांनी पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय न घेतल्यास कर्नाटक संरक्षण मंचच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील शिरोळा तालुक्यातील खिद्रापूर गावच्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष कुलदीप कदम, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष शुशांत संजय पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महांतेश पाटील, सुतार मुकासी यांनी सदर प्रकाराबाबत अधिक माहिती दिली असून पाणीपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी आम्ही घेतली असल्याचे सांगितले.
दरम्यान काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सवाल करत महाराष्ट्र सरकारने आधीच पाणी सोडण्याचे मान्य केले आहे मात्र पाणी अडवण्याची हि भूमिका आपण का घेत आहात असा प्रश्न उपस्थित केला. राजापूर बॅरेजजवळ काहींनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याने या भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.