बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर लोकायुक्तांनी आज छापा टाकला असून लोकायुक्त विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात जन्म-मृत्यू दाखला देण्यास विलंब तसेच सरकारी शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. जन्म- मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगा लावून उभे असतात. मात्र तांत्रिक अडचणीमुळे लोकांना तासानतास ताटकळत उभे राहावे लागते. त्याचप्रमाणे दाखला देण्यासाठी दहा रुपये ऐवजी 30 रुपये घेऊन लोकांची फसवणूक केली जाते. तसेच सार्वजनिक बांधकामे व इतर कामात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव महानगरपालिकेला भेट देऊन पाहणी केली.
लोकायुक्त एस. पी. मनमंत्राय यांच्या नेतृत्वाखाली दहाहून अधिक कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेवर धाड घालून चौकशी केली. त्यांनी जन्म- मृत्यू प्रमाणपत्र वितरण केंद्र, कर भरणा केंद्र, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, अभियांत्रिकी विभागाला भेट देऊन पाहणी केली आणि यासंदर्भात नोंदी जमा केल्या. नागरिकांच्या माहितीसाठी सरकारी शुल्काबाबत फलक लावण्यात यावेत त्याचप्रमाणे दोन ते पाच रुपयांची किरकोळ विक्री होत नसेल तर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅनर ठेवावा व शुल्क आकारणीची पावती द्यावी अशी सूचना यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना केली आहे.