बेळगाव : हलगा- मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांनी सुमारे दीड दशके चालविलेल्या लढ्याची धार शेतकऱ्यांतील फुटीमुळे कमी होताना दिसत आहे. या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा मोबदला घेतला आहे तसेच बायपास रस्त्याचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नुकताच हलगा-मच्छे बायपास जमीन संपादन विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील स्थगिती उठवताच ठेकेदाराने काम सुरू करण्याची घाई केली आहे. रातोरात मशीन आणि जेसीबी आणून ठेवल्या असून बायपास रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार आहे. बेळगाव परिसरातील तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनी वाचविण्याचा लढा प्रशासनाने बऱ्यापैकी हाणून पाडला आहे. तरीदेखील काही शेतकरी अजूनही जिंकू किंवा मरू या भावनेने लढा देण्यास सज्ज आहेत.
शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे प्रशासनाने याचा योग्य तो फायदा घेत रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याची धार कमी झाल्याची भावना आंदोलकांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे बेळगाव आणि परिसराचा विकास होत आहे असे जरी प्रशासन दाखवत असले तरी देखील बेळगाव परिसरातील पिकाऊ जमीन नष्ट होत आहे. पर्यायाने त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची देखील हानी होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल का असा सवाल देखील जाणकार व्यक्त करीत आहेत.