बेळगाव : खुन करण्याच्या उद्देशाने रस्त्याने पायी जाणाऱ्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील चीफ डेप्युटी फार्मासिस्ट वीरुपाक्षप्पा हर्लापूर यांचा कारने धडक देऊन ठार केल्याच्या गुन्ह्याचा छडा बेळगाव शहर रहदारी आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लावला असून खुनाच्या गुन्ह्याखाली 5 जणांना अटक केली आहे.
गदग जिल्ह्यातील बेटगेरी येथील रहिवासी असलेल्या सुरेश हर्लापूर यांनी अपघाताची तक्रार केली होती. 30 मे रोजी बीम्स जवळ अपघात झाला होता. चन्नम्मा सर्कल येथून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. अपघात घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. त्यानंतर हर्लापूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास केला असता हर्लापूर यांचा मृत्यू अपघाती नसून खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. लागलीच तपासाची सूत्रे फिरल्याने बसवराज यल्लाप्पा भगवती (वय 50, मूळचा रा. धारवाड, सध्या रा. भारत कॉलनी माळमारुती एक्सटेन्शन), प्रकाश राठोड (वय 41, रा. रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द), रवी बसू कुंबरगी (वय 28, रा. शास्त्रीनगर कंग्राळी बी.के.), सचिन पाटील (वय 24, कंग्राळी बी.के.) आणि रामू लगमा वंटमुरी (वय 28, रा. कंग्राळी बी.के.) यांना अटक केली.
नियोजन पद्धतीने शोध घेऊन खून प्रकारणाचा छडा लावल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनिंग आणि पोलीस उपायुक्तांनी रहदारी उत्तर विभागाचे एसीपी पवन एन., पोलीस निरीक्षक पी. आर. चन्नगिरी, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta