बेळगाव : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांची पितामह भीष्म यांच्या जीवनावरील कादंबरी “युगांत” बरीच गाजली. तिचा हिंदी अनुवाद डॉ. प्रतिभा मुदलीयार, हिंदी विभाग प्रमुख, म्हैसूर विद्यापीठ मैसूर यांनी अलीकडेच केला आहे. या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या पितामह भीष्मांचे साभिनय सादरीकरण माधव कुंटे हे करून देणार आहेत. माधव कुंटे हे “वऱ्हाड निघालय लंडनला” या एकपात्री प्रयोग सादरीकरणसाठी प्रख्यात आहेत. हा कार्यक्रम शनिवार दि. 22 जून रोजी सायं. पाच वाजता हिंदी प्रचार सभा खडेबाजार बेळगाव येथे आयोजित करण्यात आला असून तो सर्वांना खुला आहे. डॉ. गायकवाड यांची युगांत ही कादंबरी मूळ मराठी असून तिचे आता विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. तमिळमध्ये पी आर राजाराम यांनी अनुवाद केला असून त्याच्या तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत, तर म्हैसूर विद्यापीठातील कन्नड विभागाच्या डॉ. विजयाकुमारी यांनी युगांतचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. माधव कुंटे यांच्या कलाविष्काराचा अनुभव बेळगावकरांना मिळणार आहे. हिंदी मैत्री मंच आणि हिंदी प्रचार सभा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.