महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप
बेळगाव : बेलगाम कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामकरण बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या नोटीसनुसार आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नामांतराला कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ श्री. राजीव कुमार यांच्या नावे पत्र देवून सदर आक्षेप नोंदविण्यात आला.
स्वातंत्र्य पूर्व काळापासून “मराठा लाईट इन्फंट्री बेलगाम” येथे अस्तित्वात असून स्वातंत्र्यानंतर सुद्धा “बेलगाम” हेच नाव मराठा लाईट इन्फंट्रीची ओळख बनली आहे, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाषिक तत्त्वावर राज्यांची निर्मिती झाली आणि 1956 मध्ये बेळगावसह मराठी भाषिक भाग कन्नड भाषिक कर्नाटक राज्यात सामील करण्यात आला, तेव्हापासून बेळगावसह हा मराठी भाषिक भूप्रदेश (त्यामध्ये कॅन्टोन्मेंट प्रदेश सुद्धा सामील आहे) महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात यावा ही मराठी भाषिकांची मागणी आहे. वेगवेगळी आंदोलने, लढे आणि तोडगे मागे पडल्यानंतर 2004 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला असून तिथे केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य याना प्रतिवादी करण्यात आले आहे. अजून हा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असून त्यावेळी असे बोर्डचे नाव बदलणे चुकीचे असून हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरू शकतो त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी निकाल लागत नाही तोपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामांतराबाबत कोणताही निर्णय घेवू नये आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप नोंदवित आहोत. अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, निखिल देसाई आदी उपस्थित होते.