बेळगाव : बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील करदात्यांना १३२ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बेळगावातील एका टॅक्स कन्सल्टंटला केंद्रीय वस्तू व सेवा अधिकाऱ्यांनी (सीजीएसटी) बुधवारी (दि. १०) अटक केली. नकिब नजीब मुल्ला (वय २५, रा. आझमनगर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नकिब मुल्ला गेल्या काही वर्षांपासून बेळगावात जीएसटी कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. त्याची स्वतःची नेसस फेडरल लॉजिस्टिक कंपनीदेखील आहे. तो बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील मोठ्या व्यावसायिकांचा सीजीएसटी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होता. उत्पादनाच्या मोबदल्यात सीजीएसटी विभागाला भरावा लागणारी कर स्वरूपातील रक्कम तो व्यावसायिकांकडून घेऊन कर परतावा देत होता. त्यामुळे अनेक मोठमोठे व्यापारी आणि उद्योजक त्याला काम देत होते. मात्र, जानेवारी २०२४ पासून त्याने करदात्यांना टोपी घातल्याचे पुढे आले आहे.
करदात्यांकडून रक्कम घेतल्यानंतर त्याने ती सीजीएसटी विभागाला भरलीच नाही. मात्र, जीएसटी भरल्याचे भासवण्यासाठी करदात्यांना तो बनावट कर पावत्या देत होता. यापैकी एका व्यापाऱ्याला कर न भरल्याबद्दल विभागाकडून नोटीस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्याने याबाबत क्लब रोडवरील विभागाच्या कार्यालयात मुल्लाविरोधात तक्रार दाखल केली. ही बाब गांभीर्याने घेत सीजीएसटीच्या दक्षता विभागाने मुल्लावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर जेएमएफसी द्वितीय न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.