खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर शनया गार्डन नजीक असलेल्या (कुंभार होळ) नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला जोराची धडक बसून जांबोटीकडे जाणाऱ्या कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना, आज पहाटे (मध्यरात्री रात्री) १ च्या दरम्यान घडली आहे.
या अपघातात मच्छे येथील शंकर (मिथुन) मोहन गोमानाचे (वय २५) व आशिष मोहन पाटील (वय २६) मुळगाव हत्तरवाड खानापूर, सध्या राहणार मच्छे, हे दोघेजण जागीच ठार झाले. तर या अपघातात निकेश जयवंत पवार (वय २५) रा. मच्छे याचा पाय गुडघ्यातून मोडला असल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यासाठी त्याला बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात आश्चर्य म्हणजे, चालकाच्या बाजूला बसलेला जोतिबा गोवींद गांवकर (वय २७) रा. मच्छे, हा किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मच्छे बेळगाव येथील चौघे काल बुधवारी रात्री खानापूर येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर जांबोटीकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व शनया गार्डन नजीक असलेल्या (कुंभार होळ) नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला कार जोरात धडकली. धडक इतकी जोराची होती की कारचे इंजिन सुटून खाली पडले होते. तर कारचे चाक एकीकडे तर कारचे रेडिएटर एकीकडे असे पडले होते. तर कार कठड्याला धडक दिल्याने अंदाजे १०० मीटरवर पलटी झाली होती.