बेळगाव : महात्मा फुले भाजी मार्केट व कांदा मार्केट येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचीही भेट घेतली आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली व्यथा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे. याआधी या व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व पोलिस आयुक्त याडा मार्टीन यांची भेट घेतली आहे. मार्केटमध्ये त्यांना ज्या समस्या भेडसावत आहेत, त्यांना जो त्रास दिला जात आहे, त्याची माहिती दिली आहे.
व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १२) नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. त्यांनाही निवेदन देवून त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी दोन्ही मार्केटमधील व्यापारी उपस्थित होते. दरम्यान, महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळ्यांचा कब्जा बेकायदेशीरपणे घेतल्याबाबतचे निवेदनही गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यात महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजी मार्केटवर मालकीहक्क सांगणाऱ्यांमध्ये तसेच तेथील व्यापारी व महापालिका अधिकारी यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात महापालिकेने महात्मा फुले भाजी मार्केटमधील सहा दुकानगाळे व दोन गोदामांचा कब्जा घेतला होता. महापालिकेच्या या कारवाईला त्यावेळीं जोरदार विरोध झाला होता. मात्र, विरोध झुगारून महापालिकेने कारवाई पूर्ण केली होती. या कारवाईवेळी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याची तक्रार झाली होती. ५ जुलै रोजी या सहा दुकानगाळ्यांचा व दोन गोदामांचा कब्जा नव्या भाडेकरूंना देण्यात आला. मात्र, त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. दोन वर्षानंतर नव्या भाडेकरूंना न्याय मिळाला, पण भाजी मार्केटमधील जुने भाडेकरू तसेच मास्टरप्लॅनमधील विस्थापितांना तेथे काही दिवसांपासून त्रास दिला जात आहे. गाळ्यांचे भाडे महापालिकेला देऊ नये, आम्हाला भाडे द्यावे, असे सांगितले जात आहे. शिवाय जबरदस्तीने भाडे वसुली केली जात असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळेच अशा व्यक्तींचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी तेथील व्यापाऱ्यांकडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta