बेळगाव : 27 जुलै हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यानिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी ठिकठिकाणी शुभेच्छापर फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जातात. मात्र, मागील वर्षांपासून कोरोना सावटामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिनी होर्डिंग्ज, पुष्पगुच्छांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजाच्या कल्याणासाठी वापरा, सामाजिक उपक्रम राबवा, असे सांगितले आहे. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून तसा प्रतिसादही मिळत असून त्यानुसार बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने टिळकवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, तसेच त्यांच्या हातून दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी अधिकाधिक कार्य घडो, अशी प्रार्थना करण्यात आली.
उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिन आणि अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून कोरोना सावट दूर होऊ दे, अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी अस्मानी संकट दूर होऊ दे, सर्वांचे कल्याण होऊ दे, दुर्बल घटकावर कृपादृष्टी असू दे, अशी प्रार्थना यावेळी जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर आणि शहर प्रमुख रवींद्र जाधव यांनी विघ्नहर्त्या गणेशाकडे केली.
यावेळी विधिवत गणेशपूजन करण्यात आले. तसेच गणेशाला लाडूचा प्रसाद दाखविण्यात आला. मंदिरातील भटजींना पौरोहित्य केले.
याप्रसंगी जज्येष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळी, उपशहर प्रमुख संजय पाटील, प्रकाश भोसले, युवा सेनेचे अमोल मजुकर, कुशल मजुकर, विनायक कुंडेकर, पांडू भातकांडे, गजानन आतवाडकर, अजित हलगेकर, नागेश बिर्जे यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
Check Also
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …