बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव येथील मंगाई देवीच्या यात्रेला मंगळवारी (दि. ३०) उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ११ नंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी प्रारंभ केला. रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी मंगाई देवीचे दर्शन घेतले. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळून गेले होते.
शहापूर, वडगाव परिसरातील शेतकऱ्यांची देवी म्हणून मंदिराची ख्याती आहे. शहर परिसराबरोबर बेळगाव तालुक्याच्या अनेक गावांतून तसेच खानापूर, चंदगड भागातूनही लोक मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित होते. यात्रा सुरळीत पाडण्यासाठी चव्हाण-पाटील परिवार देवस्थान कमिटीतर्फे नेटके नियोजन केले होते.
वडगाववासियांनी भाविकांचे जल्लोषात स्वागत केले. मंदिराजवळील सर्वच गल्ल्यांमध्ये शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी मंदिराजवळून अनगोळ येथील धनगर समाजाच्या ढोलवादकांसोबत वडगावातील पंचमंडळी व चव्हाण पाटील परिवारातील सदस्यांनी सर्व देवदेवतांच्या मंदिराकडे जाऊन पूजन केले. यानंतर मंगाई देवीला चव्हाण – पाटील परिवार व मंदिराचे पुजारी महेंद्र पुजारी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. गाऱ्हाणा झाल्यानंतर देवीची ओटी भरण्यास प्रारंभ आला. सायंकाळी ७ पर्यंत परगावांहून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होती. मनपातर्फे वडगाव परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी हेस्कॉमचे एक पथकही कार्यरत होते. यात्रा काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापौर सविता कांबळे याही लक्ष ठेऊन होत्या. मंदिर आवारात पूजा साहित्य विक्रीचे स्टॉलही तसेच खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.