बेळगाव : तुमच्या आयुष्यात रोल मॉडेल असणे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घ्या. आयुष्यात कोणत्याही पदावर गेला तरी आपल्या मातीला विसरू नका, उच्च ध्येय गाठत असताना येणाऱ्या अडचणी व अपयश यांना खचून न जाता सतत प्रयत्नशील राहून यश मिळवता येते, असे उद्गार कलखांब गावचे सुपुत्र व 2023 च्या नागरी सेवा परीक्षेत 802 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या राहुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले.
येळ्ळूर येथील श्री. वाय. एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये राहुल पाटील, नुकताच “हेचि माझे सुख “हे आत्मचरित्र लिहिणारे येळ्ळूर गावचे सुपुत्र व मॉडेल शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक एल. एन. कंग्राळकर तसेच चांगळेश्वरी शाळेची माजी विद्यार्थिनी काजल धामणेकर हिने बी.ए (संगीत) या विषयात सुवर्णपदक मिळविल्यामुळे उपराष्ट्रपतीकडून तिचा सन्मान झाला होता त्याबद्दल तिचा सन्मान केला. तसेच चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या विविध शाळातून संस्थेत सन 2024 च्या एप्रिलच्या दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी कु. करुणा मजुकर (श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळळूर), द्वितीय क्रमांक मिळवणारी कू.वैष्णवी हलगेकर (रवळनाथ हायस्कूल, शिवठाण), तृतीय क्रमांक मिळवणारी कु. वैष्णवी गेजपतकर (गणेबैल हायस्कूल, गणेबैल) त्याचबरोबर गदग येथे संपन्न झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक विजेती चांगळेश्वरी लोअर प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी कु. सानवी बेडरे हिचा शाल, श्रीफळ, रोख रक्कम, पारितोषक व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी केले. सचिव प्रसाद मजुकर यांनी समाजातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच या फाउंडेशनची स्थापना केलेली असून यापुढे समाजातून गरजूंना मदत करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
तसेच सत्कारमूर्ती एल. एन. कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांनी आपले पहिले गुरु आई-वडील आणि शाळेतील सर्व शिक्षक यांचा मान सन्मान राखून नियमित अभ्यास केल्यास उच्च ध्येय गाठता येते असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचे समयोचित भाषण झाले.
अध्यक्षीय भाषणात संस्थापक वाय. एन. मजुकर म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचता येते तसेच विद्यार्थ्यांनी राहुल पाटील, काजल धामणेकरचा आदर्श व मार्गदर्शन घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करून आय.पी.एस, आय.ए.एस अधिकारी तसेच अनेक क्षेत्रात यशस्वी होण्याचे ध्येय ठेवावे.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक उपस्थित होते सूत्र संचालन ए. बी. कांबळे यांनी केले तर आभार एल. एस. बांडगे यांनी आभार मांडले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकानी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta