बेळगावात विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाच्या वतीने निदर्शने
बेळगाव : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नि:पक्षपातीपणे आवाज उठवावा, या मागणीसाठी आज बेळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
बेळगाव येथील राणी कित्तूर चनम्मा सर्कल येथून सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. बांगला देशात हिंदूंवर अत्याचार करून हिंदूंना कमकुवत करण्याचे डावपेच आखले गेले आहेत. हिंदूंची संख्या जी 32 टक्के होती ती आता 8 टक्क्यांवर आली आहे. हिंदू मुस्लिमांना भाई-भाई म्हणणाऱ्यांनी आता आवाज उठवून निषेध केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट केले पाहिजेत. दबाव आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक संघटनेच्या सर्व देशांची मदत पंतप्रधान मोदींनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदकुमार वकुंदमठ म्हणाले, अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्यास तातडीने आवाज उठवणे गरजेचे आहे. मात्र, बांगलादेशात अल्पसंख्याकांवर इतका घोर अन्याय होत असतानाही आपल्या देशात आवाज उठत नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तातडीने हस्तक्षेप करून पावले उचलावीत. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे भावकान्ना लोहार यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. तसेच त्यांना भारतात बोलावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.