बेळगाव : खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर त्यांची नावे लावून देण्यात यावी अन्यथा प्रशासनाने सामूहिक आत्महत्या करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात एका निवेदनाद्वारे केली.
खादरवाडी येथील शेतकऱ्यांची 115 एकर संयुक्तिक वडिलोपार्जित जमीन आहे. या शेतजमिनीच्या उताऱ्यावर सर्व शेतकऱ्यांची नावे नोंदविणे शक्य नसल्यामुळे तत्कालीन कुरुंदवाड संस्थानाने सदर शेतीवर समाईक नावे नोंदविण्याची सूचना केली होती, मात्र सर्व शेतकऱ्यांना सदर जमिनीत वहिवाट करता येईल असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. त्यानुसार गावातील प्रमुख पाच पंचांची नावे सदर शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यात आली होती. परंतु आत्ता सदर पंचांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता 80 एकर शेतीची विक्री केली असून यामध्ये इतर शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सदर शेत जमिनीवर शेतकऱ्यांचा हक्क राहिलेला नाही त्यामुळे खादरवाडी गावातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न देखील उद्भवला आहे. त्यामुळे खादरवाडी येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे शेत जमिनीच्या उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे लावून द्यावीत अशी विनंती केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तसे आदेश देखील दिलेले आहेत. मात्र तहसीलदार या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लवकरात लवकर शेतजमिनीच्या उताऱ्यावर आपली नावे नोंदविण्यात यावी अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे.
येत्या सात दिवसात सदर शेत जमिनीच्या सातबारावर शेतकऱ्यांची नावे लावून द्यावीत अन्यथा अन्यायग्रस्त शेतकरी आपल्या गुराढोरांसह तहसीलदार कार्यालयावर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी राकेश पाटील, फोंडू देसाई, राजेश पाटील, अरुण माळवी, विशाल पाटील, पिंटू सुतार, लक्ष्मण पाटील, रमेश माळवी, प्रल्हाद कामठी, गंगाधर कडलीकर आदी शेतकरी उपस्थित होते.