बेळगाव : राजहंसगड येथील रेशन दुकान मागील एक वर्षांपासून बंद करण्यात आले आहे, राजकीय आकसापोटी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून थातुरमातुर कारणे देऊन रेशन दुकान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरीकांची गैरसोय होत आहे.
मागील आठ वर्षांपासून विजय कुकडोळकर हे घर नंबर 50/4 मध्ये रेशन वाटप करत होते, त्यानंतर मागील वर्षापासून गावातील राजहंसगड ग्रामाभिवृद्धी व विविध उद्देश संघाकडे रेशन वाटपाचे अधिकार आले होते, आणि त्या संघाने त्या जागेतच वाटपाचे काम तसेच सुरू ठेवले होते. पण रेशन परवाना मिळवताना अधिकाऱ्यांनी घर नंबर 50/4 ऐवजी घर नंबर 90/4 हा पत्ता घातला .
याचाच फायदा घेत गावातील एकाच्या नावाने तक्रार दाखल करून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून पत्ता बदलल्याचा ठपका ठेवत रेशन दुकान स्थगित करण्यात आले आहे. तरी याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपूर्ण चौकशी करून रेशन दुकान पुर्ववत करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
यावेळी माजी आमदार संजय पाटील, धनंजय जाधव, शंकर नागुर्डेकर, जोतिबा थोरवत, हणमंत नावगेकर, सुरेश थोरवत, सिद्धाप्पा पवार, महादेव चव्हाण, गणपत जाधव, सिप्पय्या बुर्लकट्टी, बसवंत चव्हाण, कृष्णा यळेबैलकर, बाबाजी जाधव, हुवाणी बोंगाळे आदी उपस्थित होते.