बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघ, अखिल कर्नाटक महिला रयत संघ आणि हरित सेना बेंगळुरू तसेच कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी धरणे धरले.
म्हादई – कळसा – भांडुरा प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पंपसेटसाठी आणलेला नवा कायदा रद्द करावा, गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी आणि पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला असून सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांचा आग्रह करत सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन आज चौथ्या दिवशीही कायम ठेवण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शेतकरी नेत्या हेमा कागजगार म्हणाल्या की, शेतकरी हा देशाची संपत्ती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी सोडवतील असा विश्वास आहे. गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टी आणि पावसाची कमतरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचे सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.राज्य सरकारने पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, अन्यथा येत्या काळात शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र होईल, असा संताप शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल कर्नाटक रयत संघ, अखिल कर्नाटक महिला शेतकरी संघ व रयत सेना आणि विविध शेतकरी संघटनेचे नेते, शेकडो शेतकरी उपस्थित होते.