बेळगाव : बेळगावातील शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत एम. टी. पाटील यांना शनिवारी झालेल्या शोकसभेत विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाटील यांनी विविध क्षेत्रात निष्ठेने भरीव कार्य केले आहे. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी केलेल्या शोकप्रस्तावात म्हटले आहे. आदर्श को- ऑप. सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव अध्यक्षस्थानी होते.
आदर्श को-ऑप. सोसायटी व मुक्तांगण विद्यालय यांच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी अध्यक्ष एस. एम. जाधव यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. त्याला उपस्थितांनी स्तब्धता पाळून अनुमोदन दिले.
दिवंगत पाटील यांनी रजपूत बंधू हायस्कूलमध्ये शिक्षक व नंतर मालतीबाई साळुंखे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो विद्यार्थी घडविले. तसेच आदर्श को-ऑप. सोसायटी व मुक्तांगण विद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता, असे शोकप्रस्तावात म्हटले आहे.
अप्पासाहेब गुरव (मुक्तांगण विद्यालय), प्रकाश अष्टेकर (नवहिंद को ऑप. सोसायटी), जगदीश भिसे (धनश्री सोसायटी), शिवराज पाटील (मराठा समाज सुधारणा मंडळ), रघुनाथ बांडगी (बेळगाव जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ), अनिल कणबरकर (सह्याद्री को ऑप. सोसायटी), आनंद गोसावी (हरीकाका मठ), खवणेकर (खादरवाडी हायस्कूल) व दिवंगत पाटील यांची कन्या निवेदिता पाटील यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
प्रा. आनंद मेणसे समारोपाच्या भाषणात म्हणाले, एम. टी. पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे अपत्य होते. सत्यशोधक समाजाचे नेते दिवंगत व्ही. एस. पाटील यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. शिक्षण, सहकार व अंधश्रद्धा निर्मूलन या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले. त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडविणे ही आजची गरज आहे.
एम. वाय. माळवी यांनी सूत्रसंचलन केले.
आदर्श सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या शोकसभेस विविध क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.