बेळगाव : मराठा संजबांधवांच्या हितोन्नतीसाठी संघटीत प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे, असे मत मराठा समाजातील युवा नेते किरण किरण जाधव यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षण गणना 3 ब मधून 2 अ मध्ये व्हावी यासह समाज बांधवांच्या हितोन्नतीसाठी च्या अनुषंगाने असणाऱ्या मागण्यांमध्ये एकवाक्यता असावी, यासाठी शनिवारी सायंकाळी 5 वाजता बेळगाव शहरातील हॉटेल मिलन च्या सभागृहात बेळगाव उत्तरमधील मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव बोलत होते.
मराठ्यांची गणना 3 ब मध्ये केली जाते. ती गणना 2 अ मध्ये झाल्यास समाजातील विद्यार्थ्यांना याचा शैक्षणिक लाभ होईल. शिवाय नोकर भरतीसाठी ईतर शासकीय सुविधांसाठी याचा मराठा समाज बांधवांना फायदा होईल, असे सांगताना याकरिता समस्त मराठा समाज बांधवांनी संघटीत होऊन याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीर शिवाजी सेना कर्नाटक राज्याचे अध्यक्ष कमलेशराव फडतरे (बेंगळुर) उपस्थित होते.
कर्नाटक राज्यात मराठा समाजाचा आरक्षण मुद्दा दुर्लक्षित आहे. याला राजकीय उदासीनता कारणीभूत आहे. याची गंभीर्याने दखल घेतली जावी आणि मराठा समाजाची गणना 3 ब मधून 2 अ मध्ये व्हावी याकरिता मराठा समाजबांधवांनी एकव्यासपीठावर येऊन आंदोलन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मराठा समाज बांधवांना संघटीत करून आंदोलनाला धार आणण्यासाठी भरभक्कम पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या चिंतन बैठकीचे आयोजन केले गेल्याचे किरण जाधव यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी समाजबांधवांना एकसंघ करावे असे आवाहन किरण जाधव यांनी यावेळी बैठकीत केले.
बैठकीत कमलेशराव फडतरे यांनीही मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे सांगितले.
याप्रसंगी सुनील जाधव, राहुल मुचंडी, राजन जाधव, सीमा पवार, प्रज्ञा शिंदे, प्रवीण पाटील यासह उत्तरमधील इतर मराठा समाजबांधव उपस्थित होते.