बेळगाव : बेळगावचा राजा समजल्या जाणाऱ्या चव्हाट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील धर्मवीर संभाजी चौकात बेळगावच्या राजाचे प्रथम दर्शन झाले आणि आगमन सोहळ्याच्या भव्यदिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या आगमन सोहळ्यात जवळपास पाच ढोल पथक, 250 ढोल व 75 ताशे 50 ध्वज अश्या भव्य ढोल-ताशांच्या गजरात धर्मवीर संभाजी चौकातून आगमन सोहळ्यास सुरुवात झाली आहे.
माजी आमदार अनिल बेनके, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, राजू कडोलकर नगरसेविका वैशाली कडोलकर, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ बेळगाव जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, रोहित रावल, अनिल पावशे मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी प्राचार्य आनंद आपटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
धाडस ढोल पथक, शिवशंभू ढोल पथक, झुंज ढोल पथक, ब्रम्हनाथ ढोल पथक, वज्रनाथ ढोल पथक या पाचही ढोल पथकांनी एकत्र मानवंदना दिल्या. या आगमन सोहळ्यात वडगाव, अनगोळ, शहापूर तसेच बेळगाव शहर परिसरातील तरुणाईने उत्साहाने सहभाग दर्शविला.
यावर्षीची श्रीमूर्ती मूर्तिकार रवी लोहार यांनी साकारली आहे.