बेळगाव : “धनश्री सहकारी सोसायटीच्या उभारणीत आणि वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावलेले कॅप्टन गुंडोपंत कानडीकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणे अशक्य आहे. धनश्री सोसायटीला उच्च पदावर नेण हीच खरी श्रद्धांजली ठरेल” असे विचार धनश्री सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक संजीव जोशी यांनी रविवारी दुपारी बोलताना व्यक्त केले.
धनश्री सोसायटीचे संस्थापक सदस्य व विद्यमान संचालक असलेल्या कॅप्टन कानडीकर यांचे गेल्या 27 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानिमित्त धनश्री सोसायटीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना उद्योजक वसंतराव तासीलदार म्हणाले की, सैन्यात सुभेदार, सुभेदार मेजरवरून ऑनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या कानडीकर यांचा अनगोळमधील कलमेश्वर मंदिर व मारुती मंदिर उभारण्यात महत्त्वाचा वाटा आहे. अतिशय प्रामाणिक, करारी असे हे व्यक्तिमत्व निघून गेले आहे.
सह्याद्री सोसायटीचे रघुनाथ बांडगी यांनी श्रद्धांजली वाहताना कडक शिस्तीचा, स्वच्छ चारित्र्याचा व हिशेबात पारदर्शक असलेला मार्गदर्शक हरपला आहे, असे मत व्यक्त केले.
माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे यांनी धनश्री आणि इतर संस्था वाढविण्यात कानडीकरांचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजेंद्र मुतगेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. धनश्री सोसायटीच्या वतीने नागेंद्र तरळे आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने पिग्मी एजंट रामचंद्र शिंदोळकर, वसंतराव दांडेकर गुरुजी, उमेश भांदुर्गे विद्यानगर, मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने ईश्वर लगाडे, पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने अनंत लाड आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कॅप्टन कानडीकर यांचा चिरंजीव लेफ्टनंट कर्नल उमेश कानडीकर यांनी कानडीकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.” आपल्या वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आमचे काका आणि आम्ही सर्वजण उच्चशिक्षित झालो आहोत आणि आपापल्या उद्योग व्यवसायात यशस्वीरित्या स्थिरावलो आहोत” असे सांगितले. त्यांनी बेळगाव बरोबरच आपल्या जन्म गाव जंगमहट्टी येथेही काही मंदिरे उभारली आहेत अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सोसायटीचे जगदीश बिरजे यांनी केले. याप्रसंगी अनगोळ व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.