बेळगाव : गोवावेस येथील व्यापारी संकुल पाडण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे. ते संकुल जुने आहे व ते धोकादायक स्थितीत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यासाठी तेथील गाळेधारकांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. दुकानगाळे रिकामे करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गाळे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या या नोटिसीमुळे तेथील सर्वच गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या या नोटिसीला कसे उत्तर द्यावे ? नोटिसीला न्यायालयात आव्हान द्यावे का ? याचे विचारमंथन त्यांनी सुरू केले आहे.
दरम्यान, गोवावेस व्यापारी संकुलातील गाळेधारकांना याआधी दोनवेळा नोटीस बजावून त्यांच्याकडून थकीत भाडे व अनामत रक्कम महापालिकेने वसूल केले आहे. गोवावेस व्यापारी संकुलातील गाळेधारकांना 2010 मध्ये 12 वर्षे मुदतवाढ देण्यात आली होती. राज्यशासनाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली होती. त्यावेळी या दुकान गाळ्यांची भाडेवाढही करण्यात आली होती. ती 12 वर्षांची मुदतवाढ 31 मार्च 2022 रोजी संपणार आहे. त्यासाठी गाळेधारकांना थकीत भाडे व अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. तेथील गाळ्यांचा नव्याने लिलाव करण्यात येणार असल्याचे महापालिकेने नोटिसीच्या माध्यमातून कळविले होते. त्यामुळे बहुतेक सर्वांनी थकीत भाडे व अनामत रक्कम भरली. लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन पुन्हा दुकान गाळे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता; पण त्याआधीच महापालिकेने संपूर्ण संकुल पाडण्याचा, जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या संकुलात दुकानगाळ्यांसह महापालिकेची दोन विभागीय कार्यालये आहेत. अन्य शासकीय कार्यालये व संस्थांच्या शाखाही तेथे आहेत. त्या सर्वांनाच आता पर्यायी जागा शोधावी लागणार आहे. नोटिसीत नमूद केल्यानुसार या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आहे. इन्फ्रा सपोर्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंटस् या कंपनीने हे ऑडिट केले आहे. 2 नोव्हेंबर रोजी कंपनीने अहवाल पालिकेला सादर केला आहे. त्यात संकुलाची इमारत जुनी व धोकादायक असून, ती जमीनदोस्त करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार महापालिकेने संबंधित संकुल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. ए. ए. शेट्टी महापालिका आयुक्त असताना त्यांनी पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे संकुल बांधण्याचा निर्णय घेतला व बांधले. पार्किंगची सोय व मोक्याची जागा यामुळे हे संकल बेळगावातील व्यापारी केंद्र बनले; पण लवकरच हे संकुल जमीनदोस्त होणार आहे. मात्र, यामुळे अनेक व्यापारी रस्त्यावर येणार आहेत. हे संकुल पडल्यानंतर तेथे नवे संकुल बांधणार का ? त्या जागेचा वापर कशासाठी केला जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …