बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज श्री दुर्गामाता दौडीच्या चौथ्या दिवसाची सुरुवात श्री अंबाबाई देवस्थान नाथ पै चौक शहापूर येथून झाली. प्रांरभी ध्येय मंत्र म्हणून देवस्थानमध्ये श्री अंबाबाईची आरती करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रारंभी ध्वज पूजन व शस्त्र पूजन सोमवंशी क्षत्रिय समाज पंच कमिटी शहापूर, तसेच नगरसेवक रवी साळुंखे यांच्याहस्ते ध्वज चढवण्यात आला. त्यांनतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. त्यानंतर दुर्गामाता दौड शहपुर येथील विविध गल्लीतून फिरून बसवेश्वर चौक गोवावेस येथे पोहचली. अनेक ठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांच्या वतीने बलात्काराला शासन व्हावे देखावा सादर करण्यात आला. व्यसनापासून दूर होऊन देशासाठी, धर्मासाठी कार्य करावे असा सामाजिक संदेश देणारा देखावा यावेळेस सादर करण्यात आला होता. तसेच अनेक ठिकाणी बाळ गोपाळ यांनी सजीव देखावे सादर केले होते. बसवेश्वर चौक येथे बसवेश्वर महाराजांची आरती करून, ध्येयमंत्र म्हणून दौडीची सांगता झाली. यावेळी बाळकृष्ण (बाळूमामा) जगन्नाथ काजोलकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. दहा दिवस होणाऱ्या या दौडीत शहापूर विभागातील श्रीदुर्गा माता दौड ही सगळ्यात मोठी दौड मानली जाते. या दौडीचे अंतर एकूण 16 किलोमीटर इतके आहे तसेच याची सांगता खूप उशिरा होते. प्रत्येक गल्लो गल्ली उत्स्फूर्तपणे अनेक महिला मंडळे, युवक मंडळ यांनी स्वागत केले. आजच्या दौडीत बालवर्ग व युवतींचा खूप मोठा सहभाग होता.