बेळगाव : गोवा येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने बेळगावातील शैक्षणिक समूह संस्था प्रमुखांचा तसेच शिक्षकांचा गौरव समारंभ मंगळवारी पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख तसेच सहाय्यक शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आयआयएचएम संस्थेचे चेअरमन सुबर्नो बोस यांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच संचालिका शबनम हलदार यांनी शिक्षकांचा सत्कार केला. या कार्यक्रमात मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य डॉ. सुचेता कुलकर्णी, ज्ञानमंदिर शाळेच्या प्राचार्या अलका जाधव, जी. जी. चिटणीस शाळेच्या प्राचार्या नवीन शेट्टीगार, हेरवाडकर शाळेच्या प्राचार्या शोभा कुलकर्णी यांच्यासह अनेक शाळा प्रमुखांचा सत्कार झाला. तसेच उत्कृष्ट सहाय्यक शिक्षिका हा सन्मान ज्ञानमंदिर शाळेच्या शिक्षिका भूमिका बाजीकर, मॉडेल इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका अर्चना वसूलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.