बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नासंबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत. या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर येथे माजी कृषिमंत्री श्री. शरद पवार आणि श्री. जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले यांनाही पत्रे पाठवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीशी आपण चर्चा करतो असे श्री. शरद पवार यांनी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळात माजी आमदार श्री. मनोहर किनेकर, श्री. प्रकाश मरगाळे, श्री. सुनील आनंदाचे व श्री. विनोद आंबेवाडीकर यांचा समावेश होता.