बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी, हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा या गावासाठी सकाळी 7:30 वाजता परिवहन बस सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सदर गावातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बससेवेच्या मागणीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा गावातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आज गुरुवारी सकाळी ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना वरील मागणीचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कुरिहाळ, बोडकनट्टी, हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा या गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज बेळगाव शहरात येत असतात. मात्र या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 7:30 वाजता परिवहन बसची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनींना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून शाळा -महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. तरी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कुरिहाळ गावातून सकाळी 7:30 वाजता बोडकनट्टी हंदिगनुर मार्गे बेळगावपर्यंत परिवहन बस सेवेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.