बेळगाव : आज छोट्या शालेय विद्यार्थिनी जखमी घारीचा जीव वाचविला. जे. एल. विंग कॅम्प या भागातील आर्मी प्रायमरी स्कूलचा आवार वनराईने नटलेला आहे. या भागात अनेक प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात शाळेच्या जेवणाच्या वेळेस आर्मी प्रायमरी स्कूलच्या छोट्या-छोट्या विद्यार्थिनी डबा खाताना डब्यातला खाऊ पक्ष्यांना घालतात. यामुळे विद्यार्थिनींच्या डबा खाण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांनी टाकलेले खाऊ खाण्यासाठी तेथे पक्ष्यांचा वावरत असतो. कौतुकाची बाब म्हणजे नियमित तिथे येणाऱ्या पक्ष्यांना या मुली ओळखतात आणि त्या मुलीनी त्या पक्षांची नावे देखील ठेवलेली आहेत.
आज जेवणाच्या वेळेस विद्यार्थिनी डबा खावयास बाहेर पडल्या असता त्यांना आवारात एक घार जखमी अवस्थेत पडलेली आढळली. त्वरित या मुलींनी ही बाब शाळेच्या प्राचार्य शर्मिला घिवारी यांना कळविली.
प्राचार्या घिवारी यांनी याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षीप्रेमी संतोष दरेकर यांना माहिती दिली. दरेकर यांनी ताबडतोब तिथे जाऊन त्या जखमी घारीवर प्राथमिक उपचार केले आणि ती घार वन खात्याकडे सुपूर्द केली.
