बेळगाव : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने धार्मिक पर्यटन विकास अंतर्गत दोन मंदिरांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत. या अनुदानातून सौंदत्ती येथील रेणुका देवी यल्लमा देवस्थानाचा कायापालट केला जाणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाबद्दल बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत
केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने “भाग-3 (जागतिक स्तरावरील धार्मिक पर्यटन केंद्रांचा विकास) अंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य देण्याच्या योजनेच्या 2024-25 मध्ये निवडलेल्या दोन मंदिरांमध्ये भांडवली खर्चाला मंजूरी दिली आहे. कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराचा सदर योजनेत समावेश आहे, असे खासदार श्री. जगदीश शेट्टर यांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या मान्यतेबाबत संसदेत श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराचे महत्त्व आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधांची गरज सांगितली. त्यानंतर प्रकल्पाला मान्यता मिळाली. याबद्दल खासदार जगदीश शेट्टर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले आहेत.
या प्रकल्पाच्या अनुदानातून प्रस्तावित मंदिरात सर्व मूलभूत सुविधा निर्माण केल्या जातील, त्यामुळे भाविकांना निश्चितच अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, असे खास. जगदीश शेट्टर यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta