बेळगाव : पैसा कमावण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर वाळू विक्री करून सरकारची सुमारे 85 हजार रुपयांची फसवणूक व नुकसान केल्याच्या आरोपातून देसूर येथील एका शेतकऱ्याची बेळगावच्या दुसरे जे.एम.एफ.सी. न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या शेतकऱ्याचे नांव हणमंत लक्ष्मण काळसेकर (वय 50, रा. नंदीहळ्ळी रोड, देसुर, ता. जि. बेळगाव) असे आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस गेल्या 28 जुलै 2017 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास देसूर गावाच्या हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी तेथील सर्व्हे नं. 257 जमिनीमध्ये माती उपसा करून त्यावर पाणी ओतून त्यातून काढलेल्या वाळूचा ढिग करून ठेवलेला पोलिसांच्या निदर्शनास आला. तेेंव्हा त्यांनी दोन पंचांसह ग्रामपंचायत सहाय्यक बाळू वसूलकर यांना घेऊन सदरील एक ब्रास पेक्षा जास्त असलेला वाळूचा ढीग पोलिसांनी जप्त केला.
तसेच त्या जमिनीचे मालक हणमंत लक्ष्मण काळसेकर (रा. देसुर) हे असल्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर पास व परमिट न घेता वाळू विक्री करण्याद्वारे सरकारची 85 हजार रुपयांची फसवणूक व नुकसान केल्याचा आरोप ठेवून भा.द.वि. कलम 420 व कलम 4(1) (1अ) 21, 22 एम.एम आरडी प्रकारे फिर्याद दाखल करून आरोपीवर गुन्हा दाखल केला.
पुढे खटल्याचा पूर्ण तपास करून सदरी आरोपीवर दुसरे जे.एम.एफ.सी. न्यायालयात भा.द.वि. कलम 420 अन्वये दोषारोप दाखल केले. या खटल्याची नुकतीच अंतिम सुनावणी होऊन साक्षीदारातील विसंगतीमुळे न्यायालयाने आरोपी हणमंत काळसेकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.