बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी 17 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी दिली.
कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी सोमवारी बेळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार कार्यकर्त्या आणि सहाय्यक यांना वर्ग 3 आणि 4 मध्ये समाविष्ट करून कायमस्वरूपी करावे. तसेच 2018 पासून केंद्र सरकारने कोणतीही मानधनवाढ केलेली नाही. त्यामुळे मानधन 26,000 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मासिक 10,000 रुपये पेन्शन सुरू करावी. तसेच शिक्षण विभागाच्या एसडीएमसीद्वारे सुरू केलेल्या एलकेजी आणि युकेजी वर्गांना थांबवून अंगणवाडी केंद्रांना उच्च श्रेणी देऊन अंगणवाडीतच हे वर्ग सुरू करावेत, असेही त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला जी.एम. जैनेखान, दोड्डव्वा पूजारी, मंदा नेवगी, चन्नम्मा गडकरी, सी.एच. मगदूम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta