बेळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-वारणानगर च्या वतीने “स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार” प्रसिद्ध कवी डॉ. चंद्रकांत पोतदार (मराठी विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी तालुका चंदगड) यांच्या “परिघाच्या रेषेवर “या समीक्षाग्रंथास जाहीर झाला. दि. 7 व 8 डिसेंबर रोजी शाखेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलनाचे विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्र, वारणा विद्यापीठ, वारणानगर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी कविता, समीक्षा, संपादन, ललित अशा अनेक क्षेत्रात लेखन केले असून त्यांच्या लेखन साहित्याची विविध संस्थांनी नोंद घेतली आहे. हलकर्णी येथे गेली 33 वर्षे ते मराठीचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मूळचे नेज ता.हातकणंगले येथील असून आपल्या गावातही त्यांनी साहित्य चळवळ राबवून अनेक संमेलने घेतली आहेत. सीमा भागातील अनेक साहित्य चळवळींना बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना लिहिते केले आहे. साहित्य विषयक कार्यशाळा, नवलेखकाना मार्गदर्शन, प्रस्तावना, पाठराखण याबरोबरच विविध व्याख्यानमालांमधून त्यांनी समाजाचे प्रबोधनही केले आहे. गतवर्षी प्रकाशित झालेल्या. ” परिघाच्या रेषेवर” या ग्रंथात विविध विषयांच्या अनुषंगाने संकीर्ण लेखन त्यांनी केले आहे. याच समीक्षाग्रंथास वारणानगर येथील स्व.विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप असून संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, मा. विनय कोरे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. मिलिंद जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वारणानगर येथे होणाऱ्या संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्काराबद्दल मा. गोपाळराव पाटील, मा. अशोकराव जाधव, मा. संजय पाटील, मा. विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta