बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची आज गुरुवारी पहिली बैठक बेळगावात पार पडली. या बैठकीला डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या बैठकीत अनिल धुपदाळे यांनी मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेच्या ध्येय धोरणांची माहिती दिली. त्याचबरोबर आगामी काळात डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार बांधवांना सरकारी योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ मिळावा यासाठी सर्वांनी मिळून संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. श्रीकांत काकतीकर यांनी बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिक पत्रकारांसमोर असलेल्या अडीअडचणींची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर बेळगाव सीमा भागातील पत्रकारांना कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारकडून चांगल्या प्रकारचे सहाय्य मिळावे. पत्रकार संरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, याबाबत जानेवारी महिन्यात हावडा येथे होत असलेल्या भारतीय श्रमजीवी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पत्रकारांच्या हितासंदर्भात विविध बाबतीत सविस्तर चर्चा होणार आहे त्याचबरोबर नजीकच्या काळात पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने देशाची राजधानी दिल्लीत आंदोलनाचीहतयारी करण्यात येत आहे. या कामात आपल्या संघटनेचाही पूर्णपणे पाठिंबा राहावा.देश पातळीवरील पत्रकारांना त्यांच्या राज्यात राज्य सरकारने पूर्ण संरक्षण द्यावे. यासंदर्भाचा कायदा तात्काळ अमलात आणावा. डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता देऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाप्रमाणे सवलती जाहीर करण्यात याव्यात.या संदर्भात सर्वांनी संघटितपणे आणि एकदिलाने काम करावे याबाबत आपले मत मांडले. यावेळी उपस्थित अन्य सदस्यांनी त्याला सहमती दर्शवली.
नजीकच्या काळात बेळगावात बेळगाव जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची वरिष्ठ स्तरावर बैठक घेतली जावी. त्यामध्ये जास्तीत जास्त डिजिटल मीडिया पत्रकारांना सामावून घेण्यात यावे. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या जाव्यात. परिषदेच्या बेळगाव शाखेची ध्येयधोरणे निश्चित केली जावीत. परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. याबाबतही सर्वांनी एक मत दर्शविले. सुहास हुद्दार यांनी सर्वांचे स्वागत केले. अमृत बिर्जे, रोहन पाटील, संजय चौगुले, परीषद प्रतिनिधी शेखर पाटील, हिरालाल चव्हाण यांच्यासह अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.