बेळगाव : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी महामेळावा आयोजित करतात. यावर्षी देखील सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे भव्य महामेळावा आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुवर्ण विधानसभा येथे 2006 पासून भरविण्यात येते. तेव्हापासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळावा घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांना समितीतर्फे महामेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती मात्र महामेळावा कोणत्या ठिकाणी घेण्यात येणार याबद्दल निश्चित झाले नव्हते. त्यामुळे महामेळावा कोठे होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. नुकतीच समिती पदाधिकाऱ्यांची एक बैठक तालुका समितीच्या कार्यालयात झाली. बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
यापूर्वी व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन केले जात होते. मात्र मागील दोन वर्षात सरकारने पोलिसी बळाचा वापर करत महामेळावा होऊ दिला नव्हता त्यामुळे यावर्षी महामेळावा घेण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक, संभाजी उद्यान तसेच शिवाजी उद्यान व मराठा मंदिर अशा जागांचा पर्याय प्रशासनाकडे देण्यात आला होता. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार यावर्षीचा महामेळावा संभाजी चौकात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समिती कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात वेळेवर उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा. महामेळाव्याला हजर राहण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने कितीही दडपशाही केली तरी त्यांच्या दडपशाहीला न जुमानता महामेळावा यशस्वी केला जाणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुन्हा एकदा समितीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, कोणत्याही आंदोलनात दडपशाही करणे हे सीमावासियांसाठी काही नवीन नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीला न जुगारता मराठी भाषिक आणि धर्मवीर संभाजी चौकात बहुसंख्येने उपस्थित राहून हा महामेळावा यशस्वी करावा व हा महामेळावा धर्मवीर संभाजी चौकात होणार असल्याची जनजागृती करावी असे आवाहन केले. बैठकीला ऍड. एम. जी. पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे, गोपाळराव पाटील, विकास कलगटगी, रणजीत चव्हाण पाटील, बी. एस. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर आदि उपस्थित होते.