कोल्हापूर : महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भव्य भगवी रॅली कोल्हापूर ते बेळगाव निघणार आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या रॅलीमध्ये प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता कावळा नका कोल्हापूर येथे महाराणी ताराबाईच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते बेळगावकडे रवाना होणार आहेत त्यानंतर समितीतर्फे धर्मवीर संभाजी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रॅलीमध्ये शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.