बेळगाव : श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्ट, आश्रय कॉलनी नानावाडी, बेळगाव यांच्यावतीने 53 वा वार्षिक श्री अय्यप्पा पूजा महोत्सव येत्या 22 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत साजरा होत आहे अशी माहिती या महोत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री. एन. सी. आईल यांनी दिली.
या महोत्सवाबाबतची माहिती देताना ते म्हणाले की,
22 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत रोज सकाळी सहा वाजता उष: पूजा, सकाळी सात ते अकरा पर्यंत विशेष पूजा, सायंकाळी पाच ते सात पर्यंत अर्चना आणि स्पेशल पूजा, तर सायंकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत रोज भक्ती गीत गायन तसेच केरळाच्या चंडमेळा कन्नूर यांचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी साडेसहा वाजता नानावाडी येथील लक्ष्मी मंदिरापासून हत्तीवरून तालपोलीसहित मिरवणूक निघणार असून त्यानंतर साडेसात वाजता दीपाराधना व सर्वांसाठी प्रसादाचे वाटप होईल.
28 डिसेंबर रोजी अशीच मिरवणूक मिलिटरी महादेव मंदिरापासून निघणार असून सायंकाळी दीपराधना, प्रसाद वाटप होईल. 29 डिसेंबर रोजी दुपारी पडी पूजा होणार असून दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती या कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
52 वर्षा पूर्वी मिलिटरी महादेव मंदिरासमोरील खुल्या जागेत श्री अय्यप्पा पूजा सुरू करण्यात आली. त्यानंतर 1984 साली अय्यप्पा सेवा समिती ट्रस्ट रजिस्टर करण्यात आले. आश्रय कॉलनीतील जागा घेऊन तेथे श्री गणपती, श्री अय्यप्पा व भगवतीमाता आदी मंदिरे व प्रसाद निलय बांधण्यात आले त्यासाठी सुमारे 55 लाख रुपये लोकवर्गणीतून जमा करून हे उपक्रम राबविण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणी नित्य नियमाने सकाळी व सायंकाळी पूजा केली जात असून प्रत्येक संकष्टी व महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी अय्यप्पा पूजा व अन्नदान केले जाते. दरवर्षी हिंदू नववर्षा दिनी म्हणजे विशू दिनी विविध कार्यक्रम होतात तसेच रामायण चे पारायणही केले जाते. कार्तिक महिन्यामध्ये मालाधारण करण्यासाठी अनेक भाविक येतात
शबरीमलाई येथे जाण्याची इच्छा असलेल्या भक्तांना शुभेच्छा दिल्या जातात. या मंदिरामुळे या भागात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून हजारो भाविक नियमितपणे मंदिराला भेट देत आहेत. या कमिटीमध्ये के आर सेतू हे उपाध्यक्ष, कुंडोरा कनन हे सेक्रेटरी, शशीधरण हे खजिनदार आणि व्ही के महिंद्रा हे सहसेक्रेटरी तसेच एमजी विजयन हे गुरु स्वामी आहेत.
अधिक माहितीसाठी 9343171717 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.