बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात काँग्रेस अधिवेशन पार पडले त्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून राज्य सरकार विशेष कार्यक्रम राबवत आहे. बेळगाव येथे दिनांक 26 आणि 27 डिसेंबर रोजी शतक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण तसेच रस्त्याशेजारील भिंतीवर आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे. ठीकठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मात्र छत्रपती शिवाजी उद्यान तसेच महात्मा गांधी उद्यान या विद्युत रोषणाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे. येथे असणाऱ्या महात्मा गांधींच्या स्मारकाचा त्याचप्रमाणे अरगन तलाव येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याचा देखील “गांधी भारत” आयोजकांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.
नुकताच बेळगावत कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात शतक महोत्सवी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी 26 आणि 27 डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. त्यानिमित्त शतक महोत्सवी पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाचे व्यापक स्वरूप देखील तयार करण्यात आले. विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. मात्र बेळगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्याकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. मागील काही दिवसापासून अरगन तलाव परिसरातील पथदीप बंद आहेत. त्यामुळे मागील कित्येक महिन्यापासून महात्मा गांधींचा पुतळा अंधारात झाकोळला आहे. काँग्रेस अधिवेशनाचा शतक महोत्सवी कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्याप अरगन तलाव परिसरातील पुतळ्याची स्वच्छता झालेली नाही या मार्गावरील पथदीप दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे नागरिकांतून नाराजी पसरली आहे.