बेळगाव : चित्रदुर्ग पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक कर्मचारी संघ, ग्रामविकास आणि पंचायत तसेच कर्मचारी संघाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळकेरे तालुक्यातील कार्यकारी अधिकारी मडगीन बसाप्पा यांच्यावर दि. १४ फेब्रुवारी रोजी तालुका पंचायत कार्यालयात काहींनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत हल्ला केला. या दुष्कर्म्यांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी करत बेळगाव कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी पंचायत विकास अधिकारी भालचंद्र बजंत्री म्हणाले, तालुका पंचायत अधिकाऱ्यांवर अनेक पद्धतीने हल्ले करण्यात येत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांवर होत असलेले हल्ले थांबवून हल्लेखोरांवर गुंडा कायदा लागू करून अटक करण्यात यावी, असा आग्रह त्यांनी केला. तळागाळातील जनतेला अनेक पद्धतीच्या योजना पुरविण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. राज्यात साडेसहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून केवळ साडेचार लाख कर्मचारी उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत देखील आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडण्यात सरकारी अधिकारी आणि कमर्चारी तत्पर आहेत. परंतु त्यांच्यावर हल्ली हल्ले होत आहेत. हा प्रकार थांबवून हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांवर वाढत चाललेले हल्ले रोखून हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत.
