बेळगाव : मराठी भाषिक रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात सर्वत्र मराठी भाषेतदेखील फलक लावण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारत सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आणि बेळगावच्या उपायुक्तांना सूचना दिल्या होत्या . उपायुक्तांनी मराठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्हास्तरीय समिती गठीत करून समस्या सोडविण्याचे आश्वासनही दिले. मात्र, याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही अशी तक्रार करीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा इस्पितळाच्या सर्व परिसरात मराठी भाषेतून फलक लावावेत, अशी मागणी प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठी माणसांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यात याव्यात आणि कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी आपण याप्रश्नी लक्ष घालावे , उच्च न्यायालयाच्या आदेशाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करावी , निवडणूक साहित्य अर्थात मतदार यादी, फॉर्म आणि इतर संबंधित कागदपत्रे मराठी भाषेत देण्यात यावीत असा आग्रहही म. ए. समिती शिष्टमंडळाने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केला आहे .
जिल्हा रुग्णालयात बेळगावसह कोल्हापूरहून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु जिल्हा रुग्णालयात केवळ कन्नडमध्ये फलक लावण्यात आल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे रुग्णालयात सर्वत्र मराठीत देखील फलक लावण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन बीम्स रुग्णालय प्रशासनालाही सादर करण्यात आले.
याप्रसंगी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
