कडोली : मराठी साहित्य संघ, कडोली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ शुक्रवारी (ता. 10) सकाळी उत्साहात झाला. कडोलीतील श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे संचालक विनोद होनगेकर होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. श्याम पाटील उपस्थित होते. त्यांनी कडोली साहित्य संमेलनाच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेतला. या संमेलनामुळे साहित्य संस्कृती रुजविली गेली आहे. तसेच चांगले संस्कार पेरण्याचा प्रयत्न झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
सिद्राय लाड यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. प्रमुख पाहुणे सचिन कृष्णा पाटील, मयूर शहापूरकर, अमोल फडके, उमेश यशवंत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, साहिल राजू मायाण्णा, सुनील आंद्याप्पा चौगुले, परशराम यल्लाप्पा राजाई आदिंच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ह. भ. प. श्रीधर नाडगौडा यांनी पौरोहित्य केले.
प्रारंभी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या कडोली मराठी साहित्य संमेलनाची माहिती त्यांनी दिली. सर्व पाहुण्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले. यावेळी अशोक चौगुले यांनीही मनोगत मांडले. श्री. होनगेकर यांनी अध्यक्षीय समारोप केले. गिरीधर गौण्डवाडकर यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी होनगेकर यांनी आभार मानले. यावेळी संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कस्तुरबा महिला मंडळाच्या सदस्या व गावकरी उपस्थित होते.