बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम रोड येथील विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कै. गजाननराव भातकांडे यांनी 1971 मध्ये विद्या प्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. तसेच मंडळाच्या माध्यमातून गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही या शाळेतील विद्यार्थी अग्रेसर आहेत. तसेच शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे त्यानंतर रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड मार्गे शिवसृष्टी येथे सांगता होणार आहे. शोभा यात्रेची सांगता झाल्यानंतर गायिका बेला शेंडे यांच्या गायनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta