Tuesday , December 9 2025
Breaking News

आपल्या मर्यादा योग्य वेळी समजल्या तरच तणावमुक्ती होईल : युवराज पाटील

Spread the love

 

50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेतील चौथे पुष्प

बेळगाव : “आपल्याला आपली क्षमता काय आहे, आपल्या मर्यादा काय आहेत हे योग्य वेळी माणसाला कळलं पाहिजे. हे कळणं हेच ताण तणावमुक्तीचं पहिलं कारण आहे” असे विचार लोकराजा शाहू अकॅडमीचे संस्थापक, प्रेरणादायी वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते तर आज उद्घाटक म्हणून अभियंते आणि स्वामी समर्थ आराधना केंद्राचे प्रमुख सुनील चौगुले हे होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. अनंत लाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून युवराज पाटील यांचा सन्मान केला. तर सुनील चौगुले यांचा सन्मान उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी केला.
“तणाव मुक्त व्हा” या आपल्या व्याख्यानात बोलताना युवराज पाटील यांनी अनेक उदाहरणे दिली. “29 एकर जमीन असूनही अकोल्यातील ज्योती देशमुख यांचा पती, दीर व सासरा अशा तिघांनी बँक कर्जाच्या पूर्ततेसाठी आत्महत्या केली, पण त्याच ज्योती देशमुख यांनी खंबीरपणे उभा राहुनशेती व्यवसाय फायद्यात आणला. त्यावेळेला त्या म्हणाल्या की, “या कुणीही माझ्यासमोर व्यक्त झाले असते तर मी एकही आत्महत्या होऊ दिली नसती”. म्हणून व्यक्त व्हायला शिका तुमच्या समस्या आपोआप सुटतील.
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या जीवनातील प्रश्न आणि संघर्ष लिहिलेल्या 2500 वह्या होत्या त्यामानाने आपले संघर्ष फार कमी आहेत.
आत्मिक समाधानाचा मार्ग भारतातून जगभरात गेलाय असे सांगून प्रत्येकाच्या दुःखाचे कारण वेगळं आहे. असे ते म्हणाले
“हव्यास हे दुःखाचे मूळ कारण आहे. हव्यास असेल की माणसाला अहंकार निर्माण होतो आणि अहंकार असेल तर तो तणाव मुक्त होऊ शकत नाही” असेही ते म्हणाले. दांभिकपणा हेही एक तणावाचं मुख्य कारण आहे. आज हक्काचे समुपदेशक हरवलेले असल्याने नात्यामधील दुरावा वाढत चालला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती ताण-तणावर मात करू शकते याचे उदाहरण देण्यासाठी त्यांनी 448 दिवस समुद्रात काढलेल्या साल्वाडोर याचे उदाहरण सांगितले.
छंद, आनंद जोपासा, वाचन मित्रपरिवार, चर्चासत्र वाढवा. भावना व विचार समजून घ्या. जगण्यातली आनंदाची ही साधन आहेत असे सांगून माध्यमांनीही ताण वाढविलेला आहे, असे ते म्हणाले.
आपल्या 80 मिनिटाच्या व्याख्यानात त्यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. हास्याच्या गदारोळात आणि टाळ्यांच्या कडकडाटात व्याख्यानाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सुनीता मोहिते यांनी केले तर संचालक प्रसन्न हेरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *