Monday , December 8 2025
Breaking News

संविधानाचे संरक्षण आपली जबाबदारी : खासदार प्रियंका गांधी

Spread the love

 

बेळगाव : देशाचे संविधान हे केवळ पुस्तक नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण आहे. मात्र हेच संविधान धोक्यात आले असून त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस, खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले. १९२४ मध्ये महात्मा गांधींनी बेळगावात आयोजित केलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून मंगळवारी बेळगाव सीपीएड मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी खासदार प्रियांका गांधी यांनी कन्नडमध्ये सर्वांना नमस्कार करून आपल्या भाषणाची सुरुवात केली.

यावेळी खासदार प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, बेळगावच्या पवित्र भूमीवर भारतातील तमाम जनतेचे ऋण आहे. देशाच्या स्वातंत्र्याची ठिणगी येथूनच पेटली. जगात भारत हा असा देश आहे ज्याने सत्य आणि अहिंसेसाठी लढून स्वातंत्र्य मिळवले. या देशाचे संविधान हे केवळ पुस्तक नाही. हे संविधान देशातील जनतेची ढाल आहे. तेव्हा संविधान टिकवण्याचा निर्धार केला पाहिजे. संविधान बदलण्याचा आणि तुमची शक्ती आणि अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या विरोधात तुम्हाला लढायचे आहे. या संघर्षातून तुम्ही मागे हटू नका, असे आवाहन त्यांनी केले. तुरुंगात बसून इंग्रजांना माफीनामा देणारे आम्ही नाही. अनेक सरकारे आली आणि गेली पण संसदेत उभे राहून संविधान लिहिणाऱ्या आंबेडकरांचा कोणीही अपमान केला नाही. मात्र, हे काम गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. भाजप नेहमीच संविधान बदलण्याचा दावा करते. त्यांचा लोकशाहीचा हक्क हिरावून घेणाऱ्या या भाजपविरोधात देशातील जनतेला धैर्याने लढावे लागेल, असे त्या म्हणाल्या.

देशात स्वातंत्र्य, समता आणि समाज एकत्र आणणे हे काँग्रेसचे तत्त्व आहे. महात्मा गांधींचा शांतता, अहिंसा आणि सौहार्दाचा संदेश आजही प्रासंगिक आहे. देशाच्या सुसंवादासाठी ते आवश्यक आहेत. आता कधी नव्हे ते भाजप संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम दाखवू लागले आहे. पण ते नेहमीच आंबेडकरांच्या विरोधात होते. संविधान आणि लोकशाहीच्या अंमलबजावणीलाही भाजपने विरोध केला. संविधानाची अंमलबजावणी करणे ही आमची विचारधारा आहे. संविधानाचा उद्देश आणि प्रास्ताविक लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, असे त्यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मी कर्नाटकातील असून सर्वांच्या सहकार्याने आज महात्मा गांधीजींनी १९२४ मध्ये घेतलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षात काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड झाली, हे माझे सौभाग्य आहे. दि. २६ डिसेंबर रोजी नवसत्याग्रह बैठक हा नवीन ठराव घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसवाल्यांनी देशासाठी बलिदान दिले. भाजपनेच रामलीला मैदानात संविधान जाळले. या देशाची राज्यघटना, देशाच्या ध्वजाशी सहमत नसलेल्या भाजप आणि संघांनी नेहमीच आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला आहे. भाजप जात आणि धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहे. मात्र भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संघटन करण्याचे काम काँग्रेसचे राहुल गांधी करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महात्मा गांधींनी जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला. त्यांचे धोरण आजही प्रासंगिक आहे. १९२४ च्या काँग्रेस अधिवेशनाने स्वातंत्र्यलढ्याला नवी गती दिली. माणूस मरतो पण व्यक्तिमत्व नाही. क्रांतिकारकाची हत्या होऊ शकते. मात्र क्रांती कधीच मरत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि आरएसएसवर जोरदार प्रहार केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली, हे महान नायक अजरामर आहेत. त्यांची तत्त्वे आपण सर्वांनी जतन करून अंगीकारली पाहिजेत, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाल, कायदा मंत्री एच. के. पाटील, गृहमंत्री जी. परमेश्वर, विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेसचे खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *