बेळगाव : पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदनगर, वडगाव येथील नाल्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्याचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असून, परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे नाल्याच्या कामाविरोधात राम जुवेकर, श्याम जुवेकर व बसवंत शहापूरकर यांनी सहाव्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत नाल्याचे बांधकाम हाती घेऊ नये, अशी सूचना केली आहे. त्यामुळे नाला बांधकामामुळे नुकसान होणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नाल्याचे काम पूर्ण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अनेकांच्या घरावर आरेखन केले आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचा काही भाग नाल्याच्या कामात जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याने पर्यायी भागातून नाला करावा, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. इतर नागरिकांनीही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील नागरिकांची नुकसान न करता नाल्याचे बांधकाम करावे, अशी मागणी या भागातील अनेकांनी करीत जिल्हाधिकारी व महापालिकेला निवेदन दिले होते. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही नाल्याच्या कामाची पाहणी करीत सार्वजनिक बांधकाम खाते, महापालिका व नागरिकांची संयुक्त बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे लवकर बैठक घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta