बेळगाव : महाकुंभमेळ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गाने “एअरलिफ्ट”ने आणण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे.
प्रयागराज येथून मृतदेह रुग्णवाहिकेने दिल्लीला आणून तेथून विमानाने बेळगावला आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय अधिकारी एएसपी श्रुती आणि केएएस अधिकारी हर्षा उत्तर प्रदेशात गेले आहेत. जवळपास आज सायंकाळी मृतदेह बेळगावात पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
मौनी अमावस्येनिमित्त लाखो भाविक प्रयागराज कुंभमेळ्याला गेले होते. लाखो भाविक अचानक आल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत बेळगावातील चार जणांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीत वडगावी येथील रहिवासी ज्योती हत्तरवठ, मेघा हत्तरवठ, शेट्टी गल्लीतील अरुण कोपर्डे, शिवाजी नगर येथील महादेवी भावनूर यांचा मृत्यू झाला.