Wednesday , December 10 2025
Breaking News

‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’

Spread the love

 

हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा प्रारंभ: उद्या समारोप

बेळगाव -“हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावला कृष्णमय केले. दुपारी ठीक 1 वाजून 31 मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावचा एक आनंदाचा उत्सवच होता.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी बेळगावात रथयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 27 वे वर्ष आहे.
दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौकात हजारो स्त्री-पुरुष भक्त एकत्र आल्यानंतर इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, सुंदर चैतन्य महाराज, वृंदावन प्रभू आणि दयालचंद्र प्रभू यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. फुलांनी सजविले लागत आणि रथामध्ये राधा कृष्ण आणि गौरनिताय यांचे आर्चविग्रह ठेवले होते. रथाचे पूजन व आरती केल्यानंतर उपस्थितानी श्रीफळ वाढवून रथयात्रेस प्रारंभ केला.
रथाला समोरच्या बाजूला दोन्ही कडेने दोरखंड बांधण्यात आले होते. डावीकडून पुरुष आणि उजवीकडून महिला रथ ओढीत होत्या.
रथाच्या समोर भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेले आबालवृद्ध नाच गाण्यात मशगुल झाले होते.
यात्रेच्या अगदी पुढे मंजिरी बेनके यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके, ज्यामध्ये 25 तरुणींचा समावेश होता, आकर्षक रांगोळ्या घालत होती. त्या पाठोपाठ वीस हून अधिक सजवलेल्या बैल जोड्या व बैलगाड्या लोकांचे लक्ष वेधून घेत होत्या. दुसऱ्या एका विशेष सजविलेल्या रथात इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद यांचा पुतळा ठेवलेला होता. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित विविध देखावे ज्यामध्ये खास करून शरपंजारी पडलेले भीष्म, नरसिंह देव, कालिया मर्दन, झारखंड लिला अशा अनेक लीला सादर केल्या होत्या. भक्ती रसामृत स्वामी महाराज जातीने रथयात्रा मार्गावर लक्ष ठेवून होते ते आणि त्यांच्या सोबतीला असलेले अनेक ज्येष्ठ भक्त मार्गदर्शन करीत होते.
ताल धरून नृत्य करणाऱ्या तरुणी, भजन कीर्तनामध्ये सामील झालेले तरुण, रंगीबेरंगी पोशाख करून विविध देखावे सादर करणारे बालक हे रथयात्रेची शोभा वाढवीत होते. हांदिगनुरच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे स्त्री-पुरुषांचे दोन संच भजन सादर करीत होते. रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. बऱ्याच ठिकाणी नागरिकाकडून पाणी, सरबत, फळे व केळी यांचे वाटप केले जात होते. 50000 हून अधिक प्रसादाची पाकिटे इस्कॉनच्या वतीने वाटली जात होती. कृष्णभक्तीत न्हाहून निघालेला हा दीड किलोमीटर लांबीचा लवाजमा शहराच्या विविध भागात फिरला.
धर्मवीर संभाजी चौकातून दीड वाजता प्रारंभ झालेली ही रथयात्रा समादेवी मंदिर, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड, टिळक चौक मार्गे शनी मंदिराकडून कपिलेश्वर रेल्वे ब्रिजवरून शहापुरात पोहचली. तेथून नाथ पै सर्कल वरून के एल ई आयुर्वेदिक कॉलेज वरून कृषी भवन, बसवेश्वर सर्कल मार्गे साडेसहा वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिरामागे उभारण्यात आलेल्या शामियाण्यात पोहचली.
तेथे आज व उद्या दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असून भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गोसेवा स्टॉल्स, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवक- युवतीना मार्गदर्शन करणारे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.
आज अनेक ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने झाली. कृष्ण भक्ति का महत्वाची आहे याची अनेक उदाहरणे महाराजांनी आपल्या प्रवचनाद्वारे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले असून आज रथयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना रात्री पूर्ण प्रसाद देण्यात आला.
रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉन मंदिर च्या वतीने बालकिशन भट्टड यांच्या नेतृत्वाखाली अनेक कमिट्या नियुक्त करण्यात आल्या असून प्रत्येक जण रथयात्रा महोत्सव सुखरूपपणे पार पडावा यासाठी प्रयत्न करीत होते.
यात्रेमध्ये ज्येष्ठ भक्त एच डी काटवा, बालकिशन भट्टड, कन्नूभाई ठक्कर, संकर्षण प्रभू, माधवचरण प्रभू, नंद नंदन प्रभू, मदन देशपांडे, संजीवनी कृपा प्रभू, नागेंद्र प्रभू, रामप्रभू, राजाराम भांदुर्गे, उंडाळे प्रभू, क्वात्रा प्रभू, आनंद भांदुर्गे, अरविंद कोल्हापूरे आदि कार्यकर्ते कार्यरत होते.

मंदिरातील कार्यक्रम
शनिवारी सकाळी रोहिणीच्या प्रमाणे गौर आरती भजन व किर्तन झाले. त्यानंतर परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांची प्रवचन झाले

“रविवारचे कार्यक्रम”

रविवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच पर्यंत नरसिंह यज्ञ होणार असून मानव जातीच्या कल्याणासाठी होणाऱ्या या यज्ञामध्ये अनेक भक्त सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत भजन कीर्तन प्रवचन लाटलीला आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे या सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे
“पार्किंग रस्त्यावर करण्याचे आवाहन”
इस्कॉन मंदिर परिसरात असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिराला येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने मंदिराबाहेरील मुख्य रस्त्यावर पार्क करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *