
बेळगाव : बेळगाव शहर हे कलारसिकांचे शहर आहे. या शहराला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये मराठी नाटकांच्या समोरील पेचप्रसंग अधिक जटिल होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता बेळगावचे मराठी नाट्य वैभव सुरक्षित ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा पुढे सरसावली आहे. नाट्यदिंडी या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात नाट्य विषयक कार्यक्रम सुरू ठेवण्याची चळवळ आता हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती शाखेच्या अध्यक्षा विणा लोकूर यांच्यासह नाट्यकर्मी प्रा. संध्या देशपांडे, पुष्कर ओगले, गीता कित्तूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बेळगाव शाखेच्या वतीने, वार्षिक देणगी भरून नाट्यदिंडीच्या रूपात रसिकांना सहा नाटकाची मेजवानी दिली जाईल.
सदर योजना एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी, योजनेचे पैसे भरलेल्या सभासदांपुरतीच मर्यादित असेल. योजनेअंतर्गत चार नावाजलेली व्यावसायिक नाटके आणि दोन प्रायोगिक नाटके किंवा एखादा नावाजलेला रंगमंचीय कार्यक्रम, असे एकूण साहा कार्यक्रम दाखवण्यात येतील.
केवळ त्या वर्षभरासाठी, परिषदेकडे भरलेल्या देणगी प्रमाणे, आपल्याला कार्ड/पास मिळेल आणि उपक्रम पाहण्याची संधी देण्यात येणार आहे. नाट्यदिंडीचा ३०० प्रेक्षकांचा एक व्हाट्सएपच्या ग्रुप केला जाईल. दोन महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या नाटकाची माहिती, सदर ग्रुपद्वारे सादरीकरणाच्या आधी दहा ते पंधरा दिवस दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
साधारण दोन महिन्यांच्या कालावधीत एक नाटक आणण्यात येईल. वर्षभरास एकदाच पैसे भरले की येणाऱ्या प्रत्येक नाटकासाठी आपला प्रवेश निश्चित होईल.
या योजनेचा शुभारंभ रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, वरेरकर नाट्यसंघ टिळकवाडी येथे संध्याकाळी ठीक पाच वाजता होईल. प्रथम येणाऱ्या फक्त तीनशे दर्दी प्रेक्षकांना या योजनेचा आनंद लुटता येईल. तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा आणि या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta