मराठी विद्यानिकेतनमध्ये चर्चासत्राचे आयोजन….
बेळगाव : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक, फ्रेंच भाषाभ्यासक, तत्त्वज्ञ व साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर हे मराठी भाषा दिनानिमित्त बेळगावमध्ये आले होते. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षक व पालकांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी शिक्षक व पालकांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ‘शिक्षणातील सौंदर्यशास्त्र’ या त्यांच्या शिक्षकांबरोबरच्या संवादात सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या जडणघडणी मधील नेमकी भूमिका कशी असली पाहिजे याविषयी आपले विचार मांडले. शिक्षक हा केवळ माहितीचा पुरवठा करणारा स्त्रोत नसून विद्यार्थ्यांना दिलेल्या माहिती चे उपयोजन कसे होईल, व्यवहार ज्ञान कसे वाढेल याकडे त्यांचे लक्ष असावे. आपल्या विषयाची सखोल माहिती त्याचबरोबर ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कौशल्य शिक्षकांकडे असावे. शिक्षकांनी भरपूर वाचन करावे, एआय मुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होतील, विद्यार्थ्यांना माहितीचे अनेक स्त्रोत उपलब्ध होतील, त्यातील अचूक माहिती कोणती हे विद्यार्थ्याला सांगण्याचे कार्य शिक्षकांना करावे. आपल्यातील संशोधक व सृजनशीलता सतत जागृत ठेवण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे…
पालक चर्चासत्रात बोलताना डॉ. बाविस्कर म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षणाचा अट्टाहास करावा लागेल, मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषेत शिकणारी मुले एक ही भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत. मुलांना जन्माला घालणे व मुलांना वाढविणे या परस्पर दोन भिन्न गोष्टी आहेत ज्यांना मुलांची जबाबदारी घेता येईल, त्यांना पुरेसा वेळ देता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल त्यांनीच मुलांना जन्म द्यावा असे परखड मत ही त्यांनी व्यक्त केले. मुलांच्यावर घातलेली अती बंधणे व अपेक्षा किंवा मुलांना दिलेले अती स्वातंत्र्य या दोन्हीही गोष्टी घातक आहेत. आज लहान वयातच मुलांनी काय व्हावे हे पालक ठरवून टाकतात. खरंतर मुलांना काय व्हायचे आहे हे प्रत्येक मुलाने स्वतः ठरवावे. यासाठी ते म्हणाले की, कागद आणि रंग देण्याचे काम तुम्ही करा त्याची चित्रे त्याची त्याला काढू द्या. मुलांना स्वातंत्र्य द्या पण ते देत असताना त्या स्वातंत्र्याचा मुले गैरफायदा घेणार नाही याकडे मात्र पालकांचे लक्ष असावे. आज घरातील टीव्हीचा आकार मोठा होत आहे पण घरात छोटीशे वाचनालय मात्र नाही. ज्या वेळी घरातील टीव्हीचा आकार कमी आणि वाचनालयाचा आकार वाढेल तेव्हाच मुले शिकतील चौफेर ज्ञान मिळवतील.
चर्चासत्राच्या आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी परिश्रम घेतले. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षणातील बदल स्वीकारणे ही काळाची गरज असून यासाठी पालकांनी घरात तसे वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. तसेच डॉक्टर शरद बाविस्कर यासारख्या शिक्षण व सामाजिक तत्ववेत्या मार्गदर्शकांची आज समाजाला गरज आहे. त्यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन घेऊन मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुरेश पाटील, निला आपटे, इंद्रजीत मोरे, एन. सी. उडकेकर, गजानन सावंत, गौरी चौगुले, सीमा कंग्राळकर यांनी परिश्रम घेतले.