Tuesday , December 16 2025
Breaking News

बामणवाडी येथील गावठाण जमीन बळकावल्याप्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार

Spread the love

 

बेळगाव : किणये ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील बामणवाडी गावच्या 5 एकर सरकारी खुल्या गावठाण जमिनीपैकी 3 एकर जमीन कल्लाप्पा बाळाप्पा चिगरे यांनी बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. तरी याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशीसह कार्यवाही करून सदर जमीन गावाच्याच नावे राहील अशी व्यवस्था करावी आणि आम्हा गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बामणवाडी येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

बामणवाडी येथील ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते युवराज कदम व श्रीमंत सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून मागणीची दखल घेत तहसीलदारांनी येत्या दोन-तीन दिवसात आपण प्रत्यक्ष जमिनीला भेट देऊन पाहणी करून असे आश्वासन दिले.

बामणवाडी गावची सर्व्हे क्र. 29 /बी मधील 5 एकर सरकारी खुली जमीन असून या गावठाण जमिनीमध्ये शाळा, मंदिर, रहिवाशांची घरे, पाण्याच्या टाक्या आहेत. याखेरीज या ठिकाणी ऐतिहासिक असा निकामी झालेला युद्धातील रणगाडा देखील आहे, जो बेळगाव जवळील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे. परंतु सदर गावठाण जमीन कलाप्पा बाळाप्पा चिगरे नामक व्यक्तीने बेकायदेशीररित्या बळकावली आहे. गेल्या 2005 नंतर अक्रम सक्रम योजनेअंतर्गत कलाप्पा बाळाप्पा चिगरे याने गावठाण मधील 3 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. ही सरकारी जमीन अक्रम सक्रम योजनेअंतर्गत कशी काय चिगरे यांना देण्यात आली? तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याद्वारे गावकऱ्यांना आणि सरकारला देखील न्याय मिळवून द्यावा. कारण या पद्धतीने बेकायदेशीररित्या जमीन बळकवल्यास सरकारचे नुकसान होणार आहे, अशा आशयाचा निवेदनात नमूद आहे.

सदर निवेदनाची प्रत यापूर्वी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आणि बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना देखील सादर करण्यात आले आहे.

निवेदन सादर केल्यानंतर आपल्या मागणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते युवराज कदम यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊन बळकवण्यात आलेली जमीन गावाच्या नावावरच राहावी अशी मागणी केली. याप्रसंगी बामणवाडी येथील गावकरी विशेष करून महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *