बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यंदा आनंदवाडी येथील आखाड्यात बुधवार 12 मार्च रोजी कुस्तीचे मैदान भरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे सदर मैदान बुधवार दि. 12 रोजी भरवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
बेळगाव शहर परिसरातील कुस्ती प्रेक्षक आणि क्रिकेट प्रेक्षकांची कुचंबणा टाळण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघटनेने हा निर्णय घेतला आहे. या मैदानात ‘बेळगाव केसरी’ या किताबासाठी पै. महेंद्र गायकवाड विरुद्ध पै. सोहेल इराण यांच्यात तर ‘बेळगाव मल्लसम्राट’ या किताबासाठी पै. सिकंदर शेख विरुद्ध पै. विशाल हरियाणा यांच्यात आणि ‘बेळगाव रणवीर’साठी पै. शिवा महाराष्ट्र विरुद्ध पै. प्रॅडिला अमेरिका यांच्यात आणि ‘बेळगाव शौर्य” या किताबासाठी पै. हादी इराण विरुद्ध पै. दादा शेळके यांच्यात लढती होणार आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकचा वाघ पै. कार्तिक काटे दावणगिरी विरुद्ध पै. मिलाद इराण ही आकर्षक कुस्ती देखील होणार आहे. अशा अनेक मोठ्या 91 रंगतदार कुस्त्या या आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात आल्या. यंदाच्या आखाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच महिला कुस्ती प्रकारात बेळगावात कर्नाटक चॅम्पियन पै. स्वाती पाटील, कडोली विरुद्ध हरियाणा चॅम्पियन पै. हिमानी यांच्यात लढत होणार आहे.
मनोरंजन कुस्तीसाठी सलग दुसऱ्या वर्षी पै. देवा थापा हा बेळगाव आनंदवाडी आखाड्यात कुस्ती खेळणार आहे. बेळगावमधील कुस्तीशौकिनांनी आनंदवाडी कुस्ती आखाड्यातील कुस्त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta